पोळा मराठी निबंध | pola essay in marathi


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण पोळा मराठी निबंध बघणार आहोत.  या निबंधामध्‍ये पोळा हा सण कश्‍याप्रकारे व का साजरा करतात याबद्दल माहीती दिली आहे चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.




ज्याप्रमाणे पोंगल हा दक्षिण भारतातील एक महत्त्वाचा सण आहे. त्याचप्रमाणे 'पोळा' हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा सण आहे. भारत हा कृषिप्रधान देश आहे. बहुतांश लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. शेतीचा व्यवसाय बैलांच्या जिवावरच करता येतो. भारतीय संस्कृतीत गाई बैलाला महत्त्वाचे स्थान आहे. त्यांची पूजा केली जाते. 


'पोळा' हा सण श्रावण महिन्याच्या शेवटच्या दिवशी येतो. ज्या बैलांकडून वर्षभर आपण काम करून घेतो त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा करतात. या दिवशी पहाटेच शेतकरी बैलाला आंघोळ घालतात. मग बैलाला सजविण्याचे काम सुरू होते. बैलांच्या अंगावर विविध रंगांचे छापे मारतात. शिंगांना रंग देतात. बैलांच्या गळ्यात घुगूरमाळा घालतात. अंगावर झूल घालतात.


बैलं सजले की गावातील सगळ्या बैलांची मिरवणूक काढतात. त्यावेळी तरुण मुले मिरवणुकीपुढे बेभान होऊन नाचतात. त्यानंतर प्रत्येक शेतकरी आपले बैल घरी नेतो. तिथे त्याची पत्नी बैलाची मनोभावे पूजा करते. त्याला पोटभर पुरण पोळी खाऊ घालते. घरातील लहान थोर बैलांच्या पाया पडतात.



बैलांची मिरवणूक ज्यांच्या दारावरून जाते ते लोक बैलांची पूजा करतात. स्वतःच्या मालकीचे बैलं नसले तरी कोणत्याही बैलाची पूजा केल्यास चालते. शहरात बैलं नसतात म्हणून लोक कुंभाराकडून मातीचे बैलं आणून त्यांची पूजा करतात. पोळ्याच्या दिवशी बैलाला कोणत्याही कामाला लावण्यात येत नाही. त्याला मारत नाहीत. माणसाबद्दलची कृतज्ञता तर कुणीही व्यक्त करतो, पण प्राण्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्याचे वैशिष्ट्य जगात फक्त भारतीय संस्कृतीतच दिसते.


मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद


pola-essay-in-marathi
pola-essay-in-marathi

पोळा मराठी निबंध | pola essay in marathi

प्रजासत्ताक दिन वर मराठी निबंध | Republic day 26 January essay in Marathi


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण प्रजासत्ताक दिन वर मराठी निबंध बघणार आहोत. या निबंधामध्‍ये दरवषी प्रजासत्ताक दिन कश्‍याप्रकारे साजरा केल्‍या जातो याचे वर्णन केले जाते. चला तर मग सुरूवात करूया निबंधाला

निबंध 1 

प्रजासत्ताकदिन आणि  स्वातंत्र्यादिन हे दोन मोठे राष्ट्रीय समारंभ आहेत. प्रजासत्ताक दिन २६ जानेवारीला तर स्वातंत्र्यदिन १५ ऑगस्टला साजरा केला जातो. संपूर्ण राष्ट्र मोठ्या उत्साहाने हे दिवस साजरे करते. आपल्या इतिहासाची आणि हौतात्म्य स्वीकारलेल्या वीरांची आठवण देश करतो. आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी यादिवशी नवे संकल्प केले जातात.

Republic-day-26-January-essay-in-Marathi
Republic-day-26-January-essay-in-Marathi




२६ जानेवारी १९५० ला भारत एक प्रजासत्ताक राष्ट्र बनले आणि घटना लागू करण्यात आली. प्रजासत्ताक दिनाची कहाणी मोठी आहे. याचा इतिहास १९२९ साली झालेल्या लाहोरच्या काँग्रेस अधिवेशनापासून सुरू होतो. या अधिवेशनाचे पं. नेहरू अध्यक्ष होते. संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव यात पास करण्यात आला. याच दिवशी रात्री बारा वाजता रावी नदीच्या किनाऱ्यावर नेहरूंनी स्वातंत्र्याचा ध्वज फडकविला. देशाला उद्देशुन संपूर्ण स्वातंत्र्य प्राप्त करण्याची घोषण केली. हा दिवस २६ जानेवारी होता. त्यादिवशी सर्व प्रतिनिधींनी एका स्वरात भारतमातेला गुलामगिरीच्या साखळ्यांतून मुक्त करण्याची प्रतिज्ञा केली. अशा प्रकारे हा दिवस आमच्यासाठी अविस्मरणीय बनला.



त्यानंतर दरवर्षी २६ जानेवारीला भारतीय जनता या प्रतिज्ञेचा पुनरुच्चार करीत राहिली. ज्यामुळे स्वातंत्र्य चळवळीला उत्तेजन व गती मिळाली, देशप्रेम आणि देशभक्तीने झंझावाताचे रूप घेतले. १९४२ मध्ये 'भारत छोडो' चळवळीचा श्रीगणेशा करण्यात आला. शेवटी इंग्रजांना इथून जावेच लागले व देश स्वतंत्र झाला.



देशाच्या घटना निर्मितीची प्रक्रिया सुरू झाली ती २६ जानेवारी १९५० ला पूर्ण झाली. त्यानंतर भारत प्रजासत्ताक घटक राज्य बनले. त्याला सार्वभौमत्व मिळाले. त्याने लोकशाही शासनपद्धतीचा स्वीकार केला. संपूर्ण भारतात प्रसन्नता व संपूर्ण स्वातंत्र्याची एक लाट आली. लोकांनी २६ जानेवारीला त्याचे समारंभ साजरे केले. 


२६ जानेवारी हा राष्ट्रीय समारंभ असल्यामुळे त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी असते. सर्व संस्था, खाजगी व सरकारी कार्यालये, शाळा, कॉलेज इत्यादी बंद असतात. २५ जानेवारीला संध्याकाळी राष्ट्रपती इंटरनेट व दूरदर्शनच्या माध्यमातून संपूर्ण देशाला उद्देशून संदेश देतात. तो हिंदी व इंग्रजीत असतो. या प्रसंगी वृत्तपत्रे, मासिकांचे विशेष अंक प्रकाशित होतात. ठिकठिकाणी ध्वजारोहण व विशेष कार्यक्रम सादर केले जातात. संपूर्ण राष्ट्रात एक उत्साहाचे वातावरण असते.


२६ जानेवारीला सकाळी सर्वप्रथम पंतप्रधान इंडिया गेटवर जाऊन अनाम हुतात्म्यांचे स्मरण करून त्यांना श्रद्धांजली अर्पण करतात. त्यानंतर राजपथावर शानदार कार्यक्रमाला प्रारंभ होतो.  राष्ट्रपती जेव्हा तिथे येतात तेव्हा त्यांचे स्वागत उपराष्ट्रपती, पंतप्रधान, सेनेच्या तिन्ही विभागांचे प्रमुख करतात. ध्वजारोहण होते आणि नंतर सेनेच्या तिन्ही विभागांच्या तुकड्यांची परेड होते. राष्ट्रपती त्यांची सलामी घेतात. बँडवर राष्ट्रीय धून वाजविली जाते त्यानंतर भारतात तयार झालेल्या तोफा, रणगाडे, क्षेपणास्त्रांचे प्रदर्शन होते.


आपल्या सैन्याच्या तयारीची आपणास एक झलक पाहावयास मिळते. शाळेचे विद्यार्थी-विद्यार्थिनी मनोरंजनाचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतात. नंतर वेगवेगळ्या राज्यांच्या आकर्षक शोभायात्रा निघतात. त्यातून राष्ट्रीय ऐक्य, संस्कृती, इतिहास आणि समृद्धीचे दर्शन घडते. प्रादेशिक लोकनृत्ये सादर केली जातात. हा सर्व कार्यक्रम मंत्रमुग्ध करणारा असतो. हजारो लोक हे सर्व पाहण्यासाठी आलेले असतात.


इंटरनेट व दूरदर्शनवर त्याचे थेट प्रसारण केले जाते. रात्री सरकारी इमारतींवर विद्युत रोषणाई केली जाते. असे वाटते जणू दिवाळीच आहे.  राजधानी दिल्लीखेरीज इतर राज्यांच्या राजधान्या, शहरे, गावे सर्वत्र प्रजासत्ताकदिन धूमधडाक्याने साजरा केला जातो. प्रांतांच्या राजधान्यांत राज्यपाल परेडची सलामी घेतात. शाळा, कॉलेज, संस्था इ. ठिकाणी अनेक कार्यक्रम आयोजित केलेले असतात. सर्व सरकारी इमारतींवर तिरंगा फडकविण्यात येतो.


या उत्साह व उत्सवाबरोबर हा दिवस आमच्या चिंतनाचा पण आहे. तो आपणास ही प्रेरणा देतो की आपण आपल्या भारताला अधिक सुदृढ, सुखी, समृद्ध आणि उन्नत बनविले पाहिजे. आपल्या स्वातंत्र्याला कोणत्याही प्रकारचा धक्का न लागला पाहिजे. आपली त्याग आणि बलिदानाची परंपरा नेहमी लक्षात ठेवली पाहिजे. खरोखरच हा एक अविस्मरणीय दिवस असतो. राष्ट्रीय उत्सव, मेळा असतो. ज्यात सर्व वर्ग जाती, धर्माचे लहानापासून मोठ्यांपर्यंत सगळे उत्साहाने भाग घेतात. त्यामुळे आपल्या राष्ट्रीय ऐक्य, भावनात्मकता, अखंडतेला बळ मिळते. 


भारतात इतरही अनेक उत्सव होतात पण २६ जानेवारी एकमेवच. परदेशांत भारतीयांखेरीज इतर परदेशी लोक पण हा कार्यक्रम आवडीने पाहतात. या प्रसंगी इतर राष्ट्रांचे प्रतिनिधी विशेष पाहुणे पण हजर असतात. ते आपल्याबरोबर या दिवसाच्या आठवणी घेऊन जातात.


मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता .पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका  धन्‍यवाद



निबंध 2

गणतंत्र दिवस मराठी निबंध | Best Essay On Republic Day In Marathi


भारतात अनेक धार्मिक आणि सांस्कृतिक सण व उत्सव साजरे केले जातात. पण काही सण असे असतात की ज्यांचा संबंध राष्ट्र आणि त्यातील निवासी यांच्याशी असतो. स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन हे आपले राष्ट्रीय सण आहेत. १५ ऑगस्ट १९४७ ला भारत स्वतंत्र झाला. २६ जानेवारी १९५० पासून भारताने आपली नवी घटना लागू केली. स्वत:चे स्वतंत्र सरकार, राष्ट्रपती, ध्वज यांची निर्मिती झाली.


भारत जगातील सर्वात मोठे सार्वभौम प्रजासत्ताक बनले. राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्याकडे सूत्रे सोपाविण्यात आली. या दिवशी सकाळी सर्वप्रथम पंतप्रधान इंडिया गेटवर जाऊन अनाम हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहतात. सकाळी ७ वाजता राष्ट्रपती विजय चौकात येतात. तेव्हा पंतप्रधान, उपराष्ट्रपती आणि भारतीय सेनेच्या तिन्ही दलांचे सेनाप्रमुख राष्ट्रपतींचे स्वागत करतात. 


तिरंगी झेंडा फडकविल्यानंतर तिन्ही सेनेच्या तुकड्या सलामी मंचाकडे जातात. बँडवर सैनिक राष्ट्रीय संगीत वाजवितात. घोडे व उंटावर स्वार झालेल्या सैनिकांच्या तुकड्या येतात. भारतात तयार करण्यात आलेले रणगाडे, तोफा, रॉकेट आदींचे प्रदर्शन केले जाते. भारताच्या सामर्थ्याचे प्रदर्शन केले जाते. शालेय विद्यार्थी हे  नृत्ये, व्यायाम, आणि कसरतींचे प्रदर्शन करतात. विविधतेत एकता दाखविणारे देखावे निघतात. या देखाव्यांत त्या त्या राज्यांची सांस्कृतिक आणि ऐतिहासिक झलक असते. 


शौर्य गाजविणाऱ्या मुला-मुलींचा सन्मान केला जातो. साडेअकरा वाजता लाल किल्ल्यावर परेडचे विसर्जन होते. आकाशातून विमाने पुष्पवृष्टी करतात.  सर्व राज्यांत प्रजासत्ताकदिन उत्साहाने साजरा केला जातो. त्याठिकाणी राज्यपाल सलामी घेतात आणि प्रादेशिक वेशभूषेत नृत्यगायन होते. शाळेतील मुलेही सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतात. सरकारी कार्यालयांवर रोषणाई केली जाते. राष्ट्रपती भवन, संसद, सचिवालय विजेच्या रोषणाईत न्हाऊन निघतात. हे दृश्य पाहण्यासारखे असते. 



राष्ट्रपती रात्री देशी-विदेशी अतिथींना मेजवानी देतात. या दिवशी शासकीय व अशासकीय कार्यालयांना सुट्टी असते. शाळा-महाविद्यालयांत सांस्कृतिक कार्यक्रम, खेळांच्या स्पर्धा होतात.



प्रजासत्ताक दिन आपणास आपल्या कर्तव्यांची जाणीव करुन देतो. आपल्या देशातील अमर हुतात्म्यांचे स्मरण करून आपण विचार केला पाहिजे की आपण काय गमावले आणि काय मिळविले! आपण राष्ट्राच्या सेवेत सहभागी झाले पाहिजे. राष्ट्राचे ऐक्य, अखंडता, आणि रक्षणासाठी सदैव तत्पर असले पाहिजे.


मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

प्रजासत्ताक दिन वर मराठी निबंध | Republic day 26 January essay in Marathi

झाडे नसती तर  मराठी निबंध बघणार  | if trees were not there essay in marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण झाडे नसती तर  मराठी निबंध बघणार आहोत.  या निबंधामध्‍ये झाडे नसल्‍यावर कोणत्‍या गोष्‍टी अशक्‍य होतील याविषयी सविस्‍तर माहीती  दिली आहे चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.

if-trees-were-not-there-essay-in-marathi
if-trees-were-not-there-essay-in-marathi




स्वत: उन्हात उभे राहून जे दुसऱ्यांना सावली देतात आणि दुसऱ्यांसाठी फळेसुद्धा धारण करतात ते वृक्ष जणू सत्पुरुषच आहेत, असे वृक्षांचे यथार्थ वर्णन सुभाषितकारांनी केलेले आहे. सर्वांना सुखावह सावली देणारी ही झाडे नसती तर... विविध रंगांची व आकारांची पाने नसती. सुगंधी फुले नसती. मग रसाळ फळे कुठली? मग शंकराला बेल, गणपतीला दूर्वा, सत्यनारायणाला तुळस आणि मंगळागौरीला सोळा प्रकारची पत्री कोठून मिळाली असती?


झाडे नसती तर हापूसचा आंबा खायला कसा मिळाला असता? कच्ची कैरी, लालबुंद सफरचंद, डाळिंब, पेरू, अननस अशा फळांची चंगळ नसती. चाफा, मोगरा, गुलाब यांचा मन प्रसन्‍न करणारा सुवास आणि वेड लावणारे सौंदर्यच नसते. पिंपळाच्या पारावरच्या गप्पा, वडाच्या सूरपारंब्यांचा खेळ, पारिजातकाचा सडा या साऱ्या गोष्टींतील मौजच हरवली असती!


आज अनेक औषधे वनस्पतींपासून उपलब्ध होतात. कडुनिंबाची पाने आरोग्याची हमी देतात. तुळशी, बेहडा, सबजा इत्यादी औषधी वनस्पती मानवाला वरदाणापेक्षा कमी नाहीत  आहेत. झाडे नसती तर आयुर्वेद निर्माण झाला नसता. झाडे नसती तर... वाऱ्याचे अस्तित्व कसे जाणवले असते? पाऊस आला नसता... मातीची धूप थांबली नसती. चंदनाचे झाड नसते तर विरहार्ताला शीतलता आणि देवपूजेला गंध नसते. झाडे नसती तर प्रदूषणाची गंभीर समस्या निर्माण झाली असती. प्राणवायूचा पुरवठा कसा झाला असता?


झाडे नसती तर कवीमंडळींची फार अडचण झाली असती. 'त्या तरुतळी विसरले गीत' अशी सुंदर काव्यपंक्ती निर्माणच झाली नसती.  श्रावणात झोपाळे कोठे बांधले असते? सुगरण पक्ष्याने आपला घरोटा कोठे बांधला असता?


झाडे नसती तर... गजराजासारख्या शाकाहारी प्राण्यांनी काय केले असते? प्रत्येक शुभप्रसंगी आंब्याची पाने घरात मांगल्य आणतात. भाजी-आमटीच्या फोडणीची लज्जत कढीपत्ता वाढवतो. झाडे नसती तर... माणसाच्या जीवनातील हिरवेपणा, मृदुताच हरवली असती. मग चांदोबा कोठे लपला असता? हिरव्या चाफ्याला सुगंध लपवण्याची गरजच पडली नसती. रजनीगंधा धुंद झाली नसती. वृक्षाविना सारे जीवन रूक्ष झाले असते. मानवाच्या जीवनातील प्रत्येक क्षण झाडांशी इतका निगडित आहे की, त्यामुळेच माणूस आपल्या वंशावळीला 'वंशवृक्ष' असे सार्थ अभिधान देतो. असा हा मानवाचा थोर मित्र नसेल तर मानवी जीवन नष्टप्राय होईल.

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

महत्‍वाचे मुद्दे : 

(टीप : निबंध लिहीताना आपण खालील महत्‍वाचे मुद्दे  वापरू शकता. )


  • झाडांचे महत्त्व व उपयुक्तता 
  • झाडांचे विविध प्रकार
  • प्रदूषण
  • फळे, फुले, लाकडे, औषधे
  • निसर्गसौंदर्यात काव्य असते
  • पाण्याचा पुरवठा 
  • वनसंपत्ती उत्पादन 
  • पशु-पक्षी आणि मानवी जीवनाचा आधार

झाडे नसती तर मराठी निबंध बघणार | if trees were not there essay in marathi

वृक्षदिंडी निबंध इन मराठी | vruksha dindi nibandh Marathi


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण वृक्षदिंडी निबंध इन मराठी निबंध बघणार आहोत.  या निबंधामध्‍ये पर्यावरणाविषयी जनजागृती व वृक्ष लागवड वाढवण्‍याविषयी शाळेतील मुले कश्‍याप्रकारे वृक्षदिंडी काढुन वृक्षारोपण करतात याविषयी सविस्‍तर माहीती दिली आहे. चला तर मग सुरूवात करूया निबंधाला

vruksha-dindi-nibandh-Marathi
vruksha-dindi-nibandh-Marathi



पर्यावरणाचा प्रश्न ही आजची जागतिक समस्या झाली आहे. प्रदूषणाचे बळी आपण केव्हा होऊ, हे सांगता येणार नाही. हा धोका ओळखून आमच्या शाळेने विदयार्थ्यांच्या मदतीने प्रदूषणाशी दोन हात करण्याचे ठरवले. वनमहोत्सवाच्या निमित्ताने आमच्या शाळेने 'वृक्षदिंडी'चा कार्यक्रम आयोजित केला होता. त्याची तयारी जवळजवळ महिनाभर चालू होती. प्रत्येक विदयार्थ्याला आपल्या घरी एक 'बालवृक्ष' तयार करायला सांगितला होता. कोणी कोणते झाड लावावे, हे प्रत्‍येकजण आपआपल्‍या आवडीप्रमाणे ठरवु शकत होते. 


३० सप्टेंबरला सर्व विदयार्थ्यांना आपण लावलेली रोपे घेऊन सकाळी सातला शाळेत बोलावले होते, कारण त्या दिवशी शाळेतून वृक्षदिंडी निघणार होती. साऱ्या गावात फिरून ती परत शाळेतच येणार होती. शाळेच्या मागच्या मैदानात ही झाडे लावली जाणार होती. ते बालतरू भूमातेच्या स्वाधीन केले जाणार होते.



ठरल्याप्रमाणे ३० सप्टेंबरला सकाळी सात वाजताच सर्व विदयार्थी शाळेच्या गणवेशात आपापले बालवृक्ष घेऊन शाळेत हजर होते. आतापर्यंत शाळेतून अनेक प्रसंगी मिरवणुका निघाल्या होत्या; पण आजचा उत्साह अगदी आगळाच होता. कारण आम्ही स्वतः लावलेल्या व काही काळ आम्हीच जोपासलेल्या बालवृक्षांची मिरवणूक होती ती! आजच्या मिरवणुकीत दिल्या जाणाऱ्या घोषणाही आगळ्यावेगळ्या होत्या- 'झाडे लावा, झाडे जगवा, प्रदूषणाचा नाश करा', 'आजचे बालतरू, उदयाचे कल्पतरू !' वृक्षदिंडीत काही विदयार्थ्यांनी वृक्षांसारखे हिरवेगार पोशाख केले होते. त्यांच्या हातांत फलक होते- 


'वृक्षवल्ली आम्हां सोयरी', 

'एक बालक, एक झाड', 

'निसर्ग अमुचा सखा, आम्हां आरोग्य देई फुका!'


त्या बालतरूंचे स्वागत गावातील सारेजण उत्साहाने करत होते. संपूर्ण गावातून फिरत फिरत ही वृक्षदिंडी शाळेच्या मागच्या मैदानात आली. तेथे झाडे लावण्यासाठी आवश्यक ती पूर्वतयारी करून ठेवण्यात आली होती. आळी तयार होती. सर्व विदयार्थ्यांनी आपापली झाडे लावली. गुरुजींनी, मुख्याध्यापकांनीही वृक्षारोपणात भाग घेतला आणि काय गंमत ! आकाशाच्या झारीतून त्यांच्यावर पाण्याचा वर्षाव झाला. पळत पळत शाळेच्या इमारतीत शिरलो. पाऊस थांबला. टवटवीत झालेली झाडांची पाने वाऱ्याबरोबर सळसळत होती. जणू ती आनंदाने टाळ्याच पिटत होती.


मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला व पर्यावरण वाचवण्‍यासाठी तुम्‍ही कोणते उपाय वापरता  हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद


महत्‍वाचे मुद्दे : 

(टीप : निबंध लिहीताना आपण खालील महत्‍वाचे मुद्दे  वापरू शकता. )


  • पर्यावरणाचा प्रश्न
  • प्रदूषणाचे बळी 
  • झाडे लावण्याची आवश्यकता 
  • वनमहोत्सव 
  • बालवृक्षांची निर्मिती 
  • वृक्षदिंडी 
  • गणवेशात विदयार्थी 
  • इतर मिरवणुकांपेक्षा वेगळी
  • उत्साहाचे वातावरण
  • प्रत्येकाच्या हातात बालतरू वा फलक
  • काही विद्यार्थी वृक्ष बनले होते
  • लोकांच्यात उत्सुकता
  • गावभर जत्रा 
  • पाऊस 
  • त्याचे स्वागत..

वृक्षदिंडी निबंध इन मराठी | vruksha dindi nibandh Marathi

 संगणक शाप की वरदान मराठी निबंध | computer shap ki vardan essay in Marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण संगणक शाप की वरदान मराठी निबंध बघणार आहोत. या निबंधामध्‍ये संगणकाच्‍या वापरामुळे होणारे फायदे व नुकसान याबद्दल सविस्‍तर माहीती दिली आहे.  चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.

 

computer-shap-ki-vardan-essay-in-Marathi
computer-shap-ki-vardan-essay-in-Marathi



अत्याधुनिक संगणक हा विज्ञानाचा चमत्कार आहे. पण संगणकाचा वापर हानिकारक ठरणार की लाभदायक? संगणक शाप ठरेल की वरदान? हे प्रश्न बहुचर्चित ठरले आहेत. एक संगणक साधारण पंधरा माणसांचे काम करतो. संगणकाच्या साहाय्याने कामे करणारा यंत्रमानव तर एकावेळी साधारणतः पन्नास माणसांचे काम करतो आणि तेही कमी वेळात व अगदी अचूक. 


संगणक अवकाशयाने (spaceship) नियंत्रित करू शकतो. पाणबुड्यांवर नियंत्रण करतो आणि जमिनीवरील जी जी कामे मानव करतो ती सर्व कामे तो करतो. सध्या प्रवासी वाहनांत जागांचे आरक्षण करण्यासाठी, तसेच सर्व प्रकारच्या परीक्षांचे जटिल स्वरूपाचे काम करण्यासाठी संगणकाला वेठीला धरले आहे. आता बँकांमध्येही संगणकाचा मोठ्या प्रमाणात उपयोग करण्यास सुरवात झाली आहे. जेथे विषारी वायूंचा धोका आहे, तिथे संगणकनियंत्रित यंत्रमानवाचा (रोबॉट) उपयोग करून प्राणहानी टळू शकते.


संगणकामुळे कामातील चुका टाळता येतात. त्यामुळे उत्पादनखर्चात बचत होते. अर्थातच वस्तू कमी दरात विकता येते. या साऱ्यांमुळे जागतिक बाजारपेठेतील मालाची मागणी वाढते व त्यामुळे मिळणाऱ्या परकीय चलनातही वाढ होते. संगणक माणसाला बाजूला सारून काम करतो. त्यामुळे संगणकाचा वापर हा शापच आहे असे वाटू लागते. आधीच लोकसंख्या भरपूर, त्यात रोजगाराच्या संधी पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाहीत; अशा परिस्थितीत संगणक म्हणजे दुष्काळात तेरावा महिना ठरणार नाही का?



प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. तसेच संगणकाच्या चांगल्या व वाईट दोन्ही बाजू आहेत. अणुबॉम्बने जपानचा सर्वनाश केला. पण त्याच अणुशक्तीचा आपण विकासासाठी उपयोग करून घेत आहोत. नांगरणी, शिंपणी, मळणी इत्यादींसाठी मोठमोठी अवजारे आज आपण वापरतो. ही अवजारे प्रथम वापरात आली त्यावेळेस बेकारीचे असेच संकट मजुरांवर आले होते, त्याला आपण तोंड दिलेच. तसेच संगणकाचा उपयोग केल्यावर निर्माण होणाऱ्या बेरोजगारांना दुसरीकडे रोजगार उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करता येईल.


संगणकाच्या उपयोगाने आर्थिक बचत खूप होईल. या आर्थिक बळाचा उपयोग करून अधिकाधिक उदयोगधंदे निर्माण करता येईल. संगणक तयार करण्यासाठी, तसेच संगणकातील बिघाड दुरुस्त करण्यासाठी, संगणकाला लागणारे प्रोग्रॅम्स बनवण्यासाठी अनेक प्रशिक्षित माणसांची आवश्यकता असते. बेरोजगारांना प्रशिक्षण देऊन या कामात त्यांना गुंतवता येईल.



संगणक विज्ञानाचे एक अपत्य आहे. मानवाला विज्ञानाने दिलेले एक प्रभावी साधन आहे. तेव्हा संगणकाचा वापर मानवासाठी जास्तीत जास्त सुखसुविधा निर्माण करण्याकरता केल्यास, संगणक हे मानवाला लाभलेले वरदान ठरेल यात शंका नाही. आज भारतीय तरुण संगणकतज्ज्ञ अमेरिकेतील 'सायबर लॉबी' सांभाळत आहेत. आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात संगणक हा आवश्यकच आहे. मग सांगा, संगणक हा वरदान नाही का? संगणकासाठी माणूस नसून माणसासाठी संगणक आहे, हे लक्षात ठेवले म्हणजे संगणकाची धास्तीच उरणार नाही.


मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद


महत्‍वाचे मुद्दे : 

(टीप : निबंध लिहीताना आपण खालील महत्‍वाचे मुद्दे  वापरू शकता. )


  • संगणक हा एक चमत्कारच
  • अचूकतेने व अफाट गतीने कामे
  • एकाच वेळी अनेक माणसांची कामे
  • विविध प्रकारची कामे
  • शाप असे वाटते बेकारी
  • पण ही समजूत चूक
  • संगणकामुळे इतरही उदयोगांची क्षेत्रे निर्माण
  • संगणकामुळे झालेल्या बचतीतून इतर उदयोगधंदे निर्माण करावेत
  • संगणक हा वरदानच
  •  त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे

संगणक शाप की वरदान मराठी निबंध | computer shap ki vardan essay in marathi

स्वतंत्र दिन निबंध मराठी | swatantra din nibandh marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण स्वतंत्र दिन मराठी निबंध बघणार आहोत. या निबंधामध्‍ये दरवषी स्वातंत्र्यदिन कश्‍याप्रकारे साजरा केल्‍या जातो याचे वर्णन केले आहे. चला तर मग सुरूवात करूया निबंधाला

निबंध 1 

१५ ऑगस्ट १९४७ ला भारत पारतंत्र्याच्या अंधारातून निघून स्वातंत्र्याच्या प्रकाशात आला. दिडशे वर्षांची गुलामी संपली. ब्रिटिश या देशातुन निघून गेले. देशाची प्रशासन व्यवस्था व्यवस्थितपणे चालविण्यासाठी पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद व पहिले पंतप्रधान पं. नेहरू यांना नियुक्त करण्यात आले. प्रतिवर्षी १५ ऑगस्ट राष्ट्रीय पर्वाच्या रूपात साजरा केला जातो.

swatantra-din-nibandh-marathi
swatantra-din-nibandh-marathi

मुख्य समारंभ लाल किल्ल्यावर साजरा होतो. पंतप्रधान तिथे पोहोचल्यावर सेनेच्या तिन्ही विभागांचे प्रमुख त्यांना सलामी देतात.पंतप्रधान लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवितात. ध्वजाला २१ तोफांची सलामी सन्मानाप्रीत्यर्थ दिली जाते. राष्ट्राच्या नावे दिल्या जाणाऱ्या संदेशात पंतप्रधान देशाची प्रगती आणि भविष्यातील योजना याबद्दल राष्ट्राला माहिती देतात. या प्रसंगी देशातील सन्माननीय व्यक्तींबरोबरच विदेशी पाहुणे पण हजर असतात. भाषण संपल्यावर तीन वेळा 'जयहिंद'च्या घोषणेनंतर राष्ट्रगीत गायिले जाते, नंतर कार्यक्रम समाप्त होतो. १५ ऑगस्टला राष्ट्रीय सुट्टी असते. रात्री सरकारी इमारतींवर विद्युत रोषणाई केली जाते. ती पाहण्यासारखी असते. १५ ऑगस्टचा या सोहळयाचे थेट प्रक्षेपण दूरदर्शनवर आणी इंटरनेटवर दाखविले जाते. त्यानंतर देशभक्तिपर गीते, कविता, नाटके प्रसारित केली जातात. राज्या-राज्यात व गावा- गावात उत्साहाने ध्वजारोहण केले जाते. आपणा भारतीयांसाठी हा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. हा दिवस आपल्याला आपल्या जुन्या चुकांचा विचार करण्यास व त्या पुन्हा न होऊ देण्याचा प्रयत्न करण्यास सांगतो. कोणत्याही परिस्थितीत आपण आपले ऐक्य व अखंडतेचे रक्षण केले पाहिजे. तरच आपण आपल्या देशाचे नागरिक आहोत असे अभिमानाने जगाला सांगू शकू. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

निबंध 2

दरवर्षी स्वातंत्र्यदिनाला शाळेत जायचे, राष्ट्रध्वजाला वंदन करायचे, पाहुण्यांचे भाषण ऐकायचे हा एक ठराविक चाकोरीतील कार्यक्रम होता; पण यंदा आमचे वर्गशिक्षक म्हणाले की, "उदया झेंडावंदनाला याल, तेव्हा घरी सांगून या की आता एकदम संध्याकाळी घरी येऊ. आणि हो, येताना तुमचा दुपारच्या जेवणाचा डबाही घेऊन या, बरं का!"


१५ ऑगस्ट उजाडला. आम्ही शाळेत जमलो. ध्वजवंदन झाले. शाळेतील कार्यक्रम संपला. आता कोठे जायचे आहे, हे सरांनी काही सांगितलेच नव्हते, त्यामुळे उत्सुकता खूप वाढली होती. सरांबरोबर आम्ही सर्वजण निघालो.


आम्ही गावाबाहेरच्या एका जुन्या घरापाशी आलो. आमचे कुतूहल वाढले होते. सरांनी कुणाला तरी हाक मारली. एक वृद्ध पण तेजस्वी व्यक्ती पुढे आली. सरांनी ओळख करून दिली, ते सरांचे 'सर' होते. पण त्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे ते जुन्या पिढीतील एक स्वातंत्र्यसैनिक होते. १९४२ च्या 'चले जाव' आंदोलनात त्यांनी भाग घेतला होता. अनेक वर्षे ते भूमिगत होते आणि काही काळ त्यांनी कारावासही भोगला होता है पण  आम्हांला सांगितले.


स्वातंत्र्यदिनाच्या पवित्र दिवशी त्या वृद्ध तपस्वी स्वातंत्र्यसैनिकाच्या तोंडुन स्वातंत्र्यलढ्याची गाथा ऐकण्यात आम्ही रमून गेलो. दोन तास केव्हा संपले ते कळलेच नाही. त्या स्वातंत्र्यवीराने तो इतिहास प्रत्यक्ष अनुभवला होता.

नंतर ते तपस्वी आम्हांला जवळच्याच एका घरात घेऊन गेले. स्वातंत्र्योत्तर काळात काही अनाथ बालकांच्या संगोपनाची व शिक्षणाची जबाबदारी त्यांनी घेतली होती. त्या मुलांबरोबरच आम्ही आमचे भोजन केले. नंतर आम्ही काही वेळ गप्पागोष्टी व खेळ झाल्यावर घराकडे परत निघालो. तेव्हा एकच विचार मनात रेंगाळत होता की, स्वातंत्र्यदिन आज आम्ही खऱ्या अर्थाने साजरा केला.

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . पुढील निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद

निबंध 3

भारताचा स्वातंत्र्यदिन

स्वातंत्र्यदिन हा प्रत्येक राष्ट्रासाठी व त्यांच्या जनतेसाठी एक स्वतःचे अस्तित्व दाखवणारा व कोणतेही राष्ट्र असो प्रत्येकाला आपला स्वातंत्र्यदिन हा प्रिय असतो.


स्वातंत्र्य म्हणजे नेमके तरी काय हो? तर स्वातंत्र्याचे अनेक अर्थ, संकल्पना असू शकतील परंतु स्वातंत्र्य म्हणजे राष्ट्रातील व जगातील प्रत्येक व्यक्तीला वा समूहाला त्याच्या इच्छेप्रमाणे, आवडीप्रमाणे जगता यावे व तो स्वतःचे अस्तित्व तो स्वतःच्या इच्छेप्रमाणे समाजात दाखवू शकतो.


जगातील प्रत्येक राष्ट्राला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी काही धडपड करावी लागली तर काही राष्ट्रांना स्वातंत्र्य हे सहजगत्या मिळाले. राष्ट्र लोकशाही, कम्युनिस्ट, हुकूमशाही असे देत. परंतु ज्या राष्ट्रात जास्तीत जास्त लोक स्वातंत्र्य उपभोगतात तोच देश अथवा राष्ट्र हे स्वातंत्र्याचे प्रतिक मानले जाते.


आपल्या देशालाही स्वातंत्र्य मिळविताना अनेक अडचणी आल्या. परंतु देशातील स्वातंत्र्यसैनिकांनी ब्रिटिश सरकारला विरोध करून वा प्रसंगी अहिंसा करत स्वातंत्र्यासाठी प्रयत्न केले. त्यात अनेकांना प्राणांची अहिंसा करत स्वातंत्र्यासाठी प्रयत्न केले. त्यात अनेकांना प्राणांची आहुती द्यावीच लागली. परंतु स्वातंत्र्य मिळाले ते १५ ऑगस्ट १९४७ साली.


परंतु हे स्वातंत्र्य मिळविण्यास जेवढे परिश्रम, त्रास झाला तेवढाच किंबहुना त्याहून अधिक त्रास हे स्वातंत्र्य व देशातील शांतता टिकविण्यास झाला. त्यातली कारणे वेगळी वेगळी आहेत. परंतु प्रश्न पडतो की स्वातंत्र्यदिन हा खड्या पहात किंवा सुरक्षेच्या जाळ्यात म्हणजे एखाद्या तुरुंगात असल्याप्रमाणे साजरा करणे व ते हेच का स्वातंत्र्य की ज्यासाठी आपण इतकी वर्षे लढलो. ज्यांनी स्वातंत्र्यासाठी आपल्या आयुष्याची प्रसंगी जिवाची होळी केली ते जर या स्वातंत्र्यदिनाच्या वेळी उपस्थित असतील तर त्यांचीही मान शरमेने खाली जाईल.


ज्या देशाची सूरक्षाव्यवस्था व आंतरिक शांतता योग्य, मजबूत आहे त्या देशाचे स्वातंत्र्य अबाधित असते. परंतु आपल्या देशाची भौगोलिक रचना व तसेच आंतरिक रचना बघताना आपली शांतता, स्वातंत्र्य टिकविणे अवघड व महत्त्वपूर्ण असल्याचे वाटते. भारताच्या पश्चिमेस पाकिस्तान व पूर्वेस बांगलादेश ही फाळणीतून निर्माण झालेली राष्ट्रे आहेत व तीच राष्ट्रे ही जगातील व आशियातील महत्त्वाची दहशतवादी केंद्रे आहेत. व त्यांचे उद्दिष्ट हे जगातील व प्रामुख्याने विकसित देशांची शांतता, सुरक्षा भंग करणे व प्रसंगी हिंसा करणे. त्यामुळेच आपल्या राष्ट्रांना आपली सुरक्षाव्यवस्था मजबूतपणे कार्यरत ठेवणे भागच आहे.


भारतात विविध धर्माचे, पंथाचे, जातीचे लोक एकत्र राहतात परंतु भारतात धार्मिक, प्रादेशिक हे वाद देशाच्या दृष्टीने घातक निर्माण होत आहेत. भारतात अनेक धर्माचे लोक हे आपल्या पद्धतीने स्वतःच्या धर्माचे श्रेष्ठत्व गाजवताना दिसतात व त्यामुळेच आंतरिक शक्ती ह्या परोपरीने वा अनपेक्षितपणे शांततेस, सुरक्षेस आव्हान देत असतात.


ज्या देशाच्या स्वातंत्र्यास ६० वर्षे पूर्ण होऊनही त्या देशाला स्वतःचा 'स्वातंत्र्यदिन' हा सुरक्षाव्यवस्थेत पार पाडावा लागतो ही खरी शरमेची बाब आहे.


भारताचा स्वातंत्र्यदिन हा खड्या पहाऱ्यात साजरा होत असताना त्यात किती सामान्य लोक उत्साहपूर्वक सहभागा होऊ शकतात ? किती लोकांना शांत वातावरणात आपला स्वातंत्र्यदिन पाहायला मिळतो ?

स्वातंत्र्योत्तर काळात स्वातंत्र्याचे अनेक फायदे जनतेस समजते. परंतु आंतरिक शांतता निर्माण करण्यास देशातील नेते कमी पडले.

खड्या पहाऱ्यात स्वातंत्र्यदिन साजरा होत असताना पाहताना हेच का ते स्वातंत्र्य जे आपण ६० वर्षांपूर्वी मिळविले व त्यासाठी अगणित हिरे गमावले. प्रत्येक स्वातंत्र्यदिन जवळ आला की सुरक्षेची चाचपणी सुरू होते व त्या दिवसापुरता तो दिवस यथायोग्यपणे पारही पडतो. परंतु इतर दिवस हे अशांतता, भीतीपूर्ण वातावरणात होतात त्याचे काय ?

स्वातंत्र्यदिनी आमचा ऊर भरून येतो आम्ही अभिमानाने तो विविध पूर्ण पद्धतीने साजरा करतो. परंतु हा स्वातंत्र्यदिन आम्ही यापुढेही याच पद्धतीने, भीतीपूर्ण वातावरणात साजरा करणार काय ? हाच प्रश्न मनात घर करून राहतो. ज्या देशाचा स्वातंत्र्यदिन हा खड्या पहायात होतो तर मग सामान्य लोकांचे स्वातंत्र्य कसे अबाधित राहू शकते हे कळतच नाही.

म्हणूनच असे सतत वाटत राहते की माझ्या भारताचा स्वातंत्र्यदिन हा विना सुरक्षा व्यवस्थेत पार पडेल तेव्हाच तो खरा यथायोग्यपणे साजरा होऊ शकेल. व त्याचवेळी त्या राष्ट्राचे भवितव्य चांगले असेल आणि तोच माझ्या स्वप्नातील भारत असेल.मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

स्वतंत्र दिन निबंध मराठी | swatantra din nibandh marathi