कथनात्मक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
कथनात्मक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

my pet cat essay in marathi  | माझा आवडता प्राणी मांजर मराठी निबंध


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण माझा आवडता प्राणी मांजर मराठी निबंध बघणार आहोत. माझ्या घरी मनीमाऊ नावाची छोटीशी गोंडस मांजर आहे या निबंधाच्‍या मदतीने आज  आपण तिच्‍याबद्दलच माहीती करून घेऊया  चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.


my-pet-cat-essay-in-marathi
my-pet-cat-essay-in-marathi



पशू-पक्षी, मनुष्याचे जीवन साथी आहेत. गाय, म्हैस, शेळी, मेंढीपासून आपणांस दूध मिळते. कुत्रे आपल्या शेताची आणि घराची राखण करतात. पोपट, कबुतर, ससे, मांजर, पाळल्याने आपल्याला आनंद मिळतो. आपल्या गरजेनुसार आणि आवडीनुसार लोक पशू पक्षी पाळतात. माझ्या बऱ्याच मित्रांजवळ कोणता ना कोणता पाळीव प्राणी आहे.


मी पण एक छोटीशी सुंदर मांजर पाळली आहे. आम्‍ही लाडाने तिला  मनीमाऊ म्‍हणतो तिचा रंग पांढरा व काळा आहे. तिचे डोळे चमकदार निळ्या रंगाचे आहेत. आम्ही सगळे तिला 'मनीमाऊ' म्हणतो. मनीमाऊ म्हणून हाक मारताच ती धावत माझ्याजवळ येऊन बसते. मी तीला रोज दूध, ब्रेड, बिस्किट खाऊ घालतो. साबण लावून तिला आंघोळ घालतो. 


माझी मनीमाऊ मांजर पूर्णपणे शाकाहारी आहे. ती आज्ञाधारक आहे. घरात अजिबात घाण करीत नाही. त्यासाठी मी तिला बाहेर घेऊन जातो. संध्याकाळी तिला घेऊन मी बागेत फिरावयास जातो. तिथे मी तिच्याबरोबर खेळतो, धावतो तेव्हा ती शेपटी फुगवून म्याऊँ-म्याऊँ करून आपला आनंद व्यक्त करते.


मनीमाऊ घरात मुक्तपणे फिरते. परंतु खाण्याचे पदार्थ खराब करीत नाही. दारावरची घंटी वाजली की तिचे कान उभे राहतात. मग लगेच ती दाराकडे धावत जाते. जणु  आमचे स्वागतच करते. कधी-कधी ती एखादा उंदीर पकडून बाहेर पळून जाते. कुत्रा मांजरीचा शत्रू असतो. पण तीच कुत्र्यावर धावून जाते. थंडीच्या दिवसांत ती  गच्चीवर जाऊन उन्हात बसते. उन्हाळ्यात सोफ्याखाली नाही तर पलंगाखाली जाऊन बसते. मनीमाऊ मला खूप आवडते. मी कुठे बाहेर गेलो तर मला तिची खूप आठवण येते.


मित्रांनो my favourite animal cat in marathi  तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला व तुमच्‍या घरी कोणताही पाळीव प्राणी असल्‍यास त्‍याचे नाव  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

my pet cat essay in marathi | माझा आवडता प्राणी मांजर मराठी निबंध

 jangal tod ek samasya marathi nibandh | जंगलतोड  एक समस्या मराठी निंबध


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण जंगलतोड  एक समस्या मराठी निंबध बघणार आहोत.  या निबंधामध्‍ये मानवाने स्‍वताची प्रगती करण्‍यासाठी कश्‍याप्रकारे जंगलतोड करून पर्यावरणाची हानी केली आहे व याचे कोणकोणते विपरीत परीणाम होत आहेत याबद्दल सविस्‍तर निबंध दिला आहे चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.


jangal-tod-ek-samasya-marathi-nibandh
jangal-tod-ek-samasya-marathi-nibandh



निसर्गाचे चिकित्सक अभ्यासक सांगतात की, मुंगीपासून गरुडापर्यंत सर्व मानवेतर प्राणी धरतीची प्रकृती सांभाळून आपली जीवनयात्रा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात; पण माणसाची बुद्धिमत्ता आणि त्याची कार्यशक्ती निसर्गाला शाप ठरली आहे. जंगलात लागणारा वणवा ही एक नैसर्गिक आपत्ती आहे. पण काही वेळेला माणसाच्या हलगर्जीपणामुळेही जंगलात आगी लागतात आणि अफाट जंगलसंपत्ती नष्ट होते.माणसाने जास्तीत जास्त जंगलसंपत्ती नष्ट केली आहे. जंगले तोडून माणसाने नगरे वसवली. त्या नगरांतील आपल्या घरांसाठी, घरे सजवण्यासाठी माणसाने वारेमाप झाडे तोडली.


आज भारतातील जंगलांचा झपाट्याने होणारा नाश ही चिंतेची बाब ठरली आहे. वनक्षेत्र कमी झाल्यामुळे मातीची धूप व पुराचे प्रमाण वाढले आहे. अधिकाधिक भूप्रदेश ओसाड बनले आहेत. पर्जन्याचे प्रमाण कमी झाले आहे. पर्यावरणाच्या संतुलनाची समस्या निर्माण झाली आहे.


लाकडाचा उपयोग कागदाचा लगदा तयार करण्यासाठी केला जातो. यासाठीही अनेक जंगले तोडली जातात. जंगलतोड झाल्याने पर्यावरणाचा समतोल ढासळला आहे. वन उत्पादनामध्ये लाख, राळ, डिंक, औषधी वनस्पती, मध, मोह, विविध प्रकारचे गवत, रेशीम, वेत, बांबू इत्यादी असंख्य वस्तूंचा समावेश होतो. वनातील वृक्षावरील एक प्रकारच्या किड्यापासून लाख मिळते. 


बाभळीची साल कातडी कमावण्यासाठी व औषधासाठी उपयोगी असते. शेतकऱ्यांची अवजारे, क्रीडासाहित्य, काडेपेटीतील काड्या यांसाठी ही जंगलतोड होते. जंगलनाशाबरोबर जंगलातील प्राणी-पक्षीही कमी होत आहेत. वाघ व मोर यांची हौसेखातर प्रचंड हत्या होते, हे थांबायला हवे आहे. वृक्ष-संरक्षण कायदा केला गेला आहे. पण सर्व गोष्टी केवळ कायदयाने होत नाहीत. त्यासाठी सर्वसामान्य जनतेचे त्याला हार्दिक व विधायक सहकार्य हवे. 


जंगले नष्ट झाली की तेथील आदिवासींचेही प्रश्न उभे राहतात. 'मेळघाट प्रकल्प'सारख्या अनेक संस्था निर्माण झाल्या पाहिजेत आणि वनाच्या रक्षणाची जबाबदारी प्रत्येकाला आपली वाटली पाहिजे. नाहीतर पुढील काळात एखादया भल्यामोठ्या ओसाड जागेवर पाटी लावावी लागेल - 'येथे जंगल होते.' 


मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला व जंगलतोड थांबवण्‍यासाठी कोणते उपाय केले पाहीजेत  हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद


jangal tod ek samasya marathi nibandh | जंगलतोड एक समस्या मराठी निंबध

maza avadta kavi marathi nibandh | माझा आवडता कवी मराठी निबंध


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण माझा आवडता कवी मराठी निबंध बघणार आहोत. या लेखामध्ये ऐकून 4 निबंध दिलेले आहेत ते क्रमाने वाचू शकता. या निबंधामध्ये आपण कवी कुसुमाग्रज यांच्या विषयी माहिती दिली आहे. त्या पुढील निबंधात तुकाराम महाराज यांच्याबद्दल निबंध सादर केला आहे  तर मग सुरूवात करूया निबंधाला


 मुद्दे : 


  • अनेक लेखक आवडीचे 
  • त्यांपैकी एक - वैशिष्ट्ये 
  • इतर समकालीन लेखकांची तुलना
  • त्यांनी लिहिलेले विविध साहित्य
  • विविध साहित्यांमधील काही वैशिष्ट्यपूर्ण वाक्ये किंवा पंक्ती
  • एखादे विशेष पुस्तक - का आवडते त्याचे कारण
  • व्यक्तिरेखा - व्यक्ती व साहित्यिक म्हणून त्यांच्याविषयी वाटणारा आदर


विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज हे कवी तर होतेच त्याचप्रमाणे नाटककार,  कथाकार व वृत्तपत्रलेखकही होते. पण त्यांच्या या सर्व साहित्यिक कलाकृतीतून लक्षात राहतो तो त्यांच्यातला कवीच! मग 'नटसम्राट' नाटकातील बेलवलकर असो, 'कौन्तेया'तील कर्ण असो वा 'स्वप्नांचा सौदागर' या लेखातील चंद्राची जगाशी ओळख करून देणारा ललितलेखक असो; या सर्वांतून कुसुमाग्रजांचा काव्यात्म पिंड कधीच लपून राहत नाही.

maza-avadta-kavi-marathi-nibandh
maza-avadta-kavi-marathi-nibandh



'जीवनलहरी' हा कुसुमाग्रजांचा पहिला लहानसा कवितासंग्रह प्रसिद्ध झाला आणि त्यानंतर 'विशाखा', 'किनारा', 'मराठी माती', 'स्वगत', 'हिमरेषा', 'वादळवेल', 'छंदोमयी' अशा आपल्या काव्यसंग्रहांतून या कविश्रेष्ठाने रसिकांना काव्यामृताचा आस्वाद सातत्याने दिला आहे.


कुसुमाग्रजांच्या कवितेची विशेष खासियत म्हणजे त्यांची कविता श्रेष्ठ टीकाकारांना जशी आवडली, तशी अगदी सामान्य रसिकांनाही आवडली आहे. आपल्या या कवितांना कुसुमाग्रज स्वतः समिधा' म्हणतात -



समिधाच सख्या या, त्यात कसा ओलावा 

कोठून फुलापरि वा मकरन्द मिळावा

जात्याच रुक्ष या, एकच त्या आकांक्षा

तव आन्तर अग्नी क्षणभर तरी फुलवावा.


या काव्यपंक्तीतून कुसुमाग्रजांची विनम्रता प्रत्ययाला येते. त्याचप्रमाणे त्यांच्या काव्यरचनेमागील हेतूही स्पष्ट होतो. सामाजिक विषमतेतील संघर्ष या कवीला सतत अस्वस्थ करतो व तो संघर्ष वेगवेगळ्या प्रतीकांतून प्रभावीपणे व्यक्त होतो. कधी तो संघर्ष उद्दाम' आगगाडी आणि तिच्याखाली चिरडली जाणारी जमीन यांमधील असतो; तर कधी तो उफाळणारा सागर व त्याला आव्हान देणारा कोलंबस यांच्यातील असतो.



कुसुमाग्रजांच्या प्रतिभाशक्तीला अजोड अशा तरल कल्पकतेची जोड लाभली आहे. मग ती कधी 'पृथ्वीचे प्रेमगीत' गाऊ लागते; तर कधी 'अहि-नकुलाच्या' रूपकातून भिन्न प्रवृत्तींचा संघर्ष मांडते. कुसुमाग्रजांची काव्यवृत्ती भव्यतेला गवसणी घालू पाहणारी आहे. लोकमान्यांच्या पुतळ्याच्या सान्निध्यात त्यांचे मन म्हणते, "ते होते जीवित अन् हा जीवितभास.' कुसुमाग्रजांच्या मनाला दिव्यत्वाचा, उदात्ततेचा, मृत्युंजयाच्या शोधाचा ध्यास लागलेला होता.


असा हा 'ज्ञानपीठ पुरस्कार' विजेता माझा आवडता कवी अनंतात विलीन झाला. त्यांच्या काव्याचा दीपस्तंभ भविष्यातील हजारो मराठी कवींना प्रेरणादायी मार्गदर्शक म्हणून अनंतकाळ प्रकाश पुरवत राहील.

निबंध 2

majha avadta kavi essay in marathi 


भागवत धर्माचा प्रसार करणारे एकनाथ समाधिस्थ झाले व तुकारामांच्या रूपाने भक्तीचा अधिकच तेजस्वी तारा उदयास आला. तुकाराम महाराज साधे वाणी, अडाणी, मराठा कुलात जन्मले. त्यांच्या घरात विठ्ठलभक्तीची परंपरा होती. लहानपणीच त्यांच्यावर व्यवसायाची जबाबदारी येऊन पडली होती व ती ते यशस्वीपणे पार पाडत होते. लहान वयातच त्यांचे लग्नही झाले होते. परंतु अचानक पडलेल्या दुष्काळच्या तडाख्याने ते हवालदिल झाले. त्यांच्या संसाराची राखरांगोळी झाली.


संसाराच्या काट्याकुट्यांनी रक्तबंबाळ झाल्यावर त्यांच्या मनाला परमार्थाची ओढ लागली. मग मन परमार्थात रम लागले. मग असे वाटू लागले बरे झाले देवा निघाले दिवाळे। बरी या दुष्काळे पीडा केली। समाजापासून, संसारापासून दूर डोंगरावर जाऊन त्यांनी भक्तीचा साधना केली. बाबाजी चैतन्य या गुरूंपासून ‘रामकृष्ण हरी' या मंत्राचा त्यांना लाभ झाला.

शिवाजीमहाराज त्यांच्या कीर्तनाला गेले होते. त्यांनी तुकारामांना नजराणा पाठवला होता. तुकारामांनी तो नाकारला. या 'वैभवाच्या धन्याला' समाजकंटकांकडून खूप त्रास भोगावा लागला होता. परंतु त्यांनी या दांभिकांवर शब्दाचा आसूड मारला होता. संस्कृतमधील ज्ञान मराठीत आणलं म्हणून पंडितांचा राग. म्हणून रामेश्वरभटाने त्यांचे अभंग इंद्रायणीत बुडवले. पांडुरंगाने अभंग तारले.


सर्वसामान्य माणसांना तुकारामांविषयी जिव्हाळा वाटत असे. त्यांच्या कीर्तनाला त्याची खूप गर्दी होत असे. आपल्यासारखाच चुकणारा, विव्हळणारा जीव आता शांती-सुख-आनंदात डुंबत आहे, तुकाराम ज्या पायऱ्या चढून उंच मोकळ्या जागी, स्वच्छ मोकळ्या वातावरणात जाऊन बसले होते, तेथे आपण जावे असे त्यांना वाटे.


संत तुकारामांचे जीवन म्हणजे 'गरुडाचे उड्डाण.' त्यांच्या झेपेकडे पाहून माणूस अवाक् होतो. त्यांच्याबद्दल त्याला विस्मय वाटतो. परंतु साध्या, सोप्या, सरळ भाषेत त्यांनी पिटलेल्या भक्तीच्या डांगोयानं तो तुकारामांचा नकळत अनुयायी बनतो

खरोखर हे कवी तुकाराम ‘आकाशाएवढे' होते. भागवत धर्ममंदिराचा कळस होते. मराठी सारस्वताचे शिखर होते. त्यांच्या अभंगातील आर्तता, खंबीरपणा, निस्सीम भक्ती, मनातील संघर्ष, आध्यत्मिक उंची माझ्या मनाचा ठाव सोडत नाही.

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . पुढील निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद

निबंध 3



माझा आवडता कवी - बालकवी

बालपणी शाळेत शिकत असताना मनावर मोहिनी घालणाऱ्या विविध कवींच्या ज्या कविता बालकांच्या जिभेवर नाचत असतात, त्यात बालकवींच्या दहा-बारा निसर्ग-कवितांचा अग्रक्रम लागतो. बालपणी मनावर मोहिनी पडते ती त्या ओळीत जाणवणाऱ्या नादमयतेची आणि तालाची १९९० हे वर्ष बालकवींचे जन्मशताब्दीचे वर्ष म्हणून साजरे झाले उत्कृष्ट आत्मनिष्ठ कविता लिहिणारे श्रेष्ठ कवी म्हणजे बालकवी.

 बालकवींनी निसर्ग कविता समृद्ध केली. त्र्यंबक बापूजी ठोंबरे ऊर्फ बालकवी यांचा जन्म १३ ऑगस्ट १८९० या दिवशी खानदेशातील धरणगाव या गावी झाला. बालकवींवर शालेय जीवनातच घरी भक्ती,काव्य,रसिकता यांचे आई व आजीकडून संस्कार झाले परतुका गोडी त्यांना थोरली बहीण जिजी हिने लावली नाशिकच्या दूधभांडे शास्त्र्यांनी त्यांना कालिदास,भवभूती यांच्या काम परिचय करून दिला. 

तसेच रामायण, महाभारत, शांकरभाष्य यांचेही ज्ञान करून दिले. जुन्या काळी संस्कृतचा विषयाचा अभ्यास ज्या कवींनी केला होता, त्यांच्या मराठी काव्याला एक वेगळे, नवे, देखणे, काव्यात्मक, रंगतदार रूप कसे प्राप्त होते ते पहावयाचे असल्यास आपण बालकवींच्या कवितांचे पुर्नवालोकन करावयास हवे. 


बालकवींनी बागेचे वर्णन करणारी पहिली कविता १९०३ साली लिहिली आणि २८ वर्षांचे आयुष्य निसर्गकवी या बिरुदाने मिरवावे अशा दर्जाची नवी निसर्गकविता त्यांनी मराठी भाषेला दिली केशवसुत, गोविंदाग्रज विनायक आणि रे. टिळक यांच्या काळात बालकवी आपल्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाच्या कविता लिहीत होते त्यात प्रेमकविता, उदास व काव्यात्मक वृत्तीच्या कविता आहेत आणि समृद्ध निसर्गाचे मानवीरूप प्रत्ययाला आणून देणाऱ्या कविताही आहेत निसर्गाशी बालकवींचे बालपणीच नाते जडले. 


केशवसुतांनी जी एक असांकेतिक, बंधनरहीत, काव्यात्मक अशी नवी कविता लिहिली तिचा संस्कार बालकवींवर झाला एवढेच त्यांचे केशवसुतांच्या कवितेशी नाते सांगता येते रेव्ह. टिळकांच्या कवितांतील भक्तिपणाचाही थोडाफार संस्कार बालकवींच्या समृद्ध निसर्गकवितांत जाणवतो. पण त्यापेक्षा अधिक त्यांनी कोणाकडूनही काही संस्कार घेतले आहेत असे म्हणता येत नाही १९१० सालीच जळगाव येथील कविसंमेलनात त्यांचा उत्स्फूर्त सन्मान झाला होता -बालकवी म्हणून आधुनिक मराठीतील खरे स्वयंभू कवी असे बालकवींना म्हणायला काहीच हरकत नाही. 


कविता हे केवळ पद्यच नसते, काव्यात्म मनोवृत्तीची ती प्रतिमामय आविष्कृती असते हे आपल्याला बालकवींच्या कवितांवरूनच म्हणता येते. "भिंत खचली उलथून खांब गेला जुनी पडकी उध्वस्त धर्मशाळा तिच्या कोलारी बसुनि पारवा तो खिन्न निरस एकान्त गीत गातो" या ओळी वाचताना आपल्या डोळ्यासमोर पारवा तर उभा राहतोच त्याचबरोबर बालकवींची कविता गाणारी खिन्न मूर्तीही डोळ्यासमोर उभी राहते. "झाकाळुनी जल गोड कालिमा पसरी लाटांवर, पाय टाकुनी जळात बसला असला औदुंबर' या ओळी वाचल्यावरही अवतीभवतीचे सुंदर निसर्गदृश्य पाहत औदुंबरच जलात उतरला आहे असे वाटते बालकवींचे व्यक्तित्व हे बालसुलभवृत्तीचे होते. 


सृष्टीकडे पाहण्याची त्यांची दृष्टी बालसुलभ होती. फुलराणीच्या या ओळीतच पहा, "हिरवे हिरवे गार गालिचे हरित तृणांच्या मखमालीचे त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ती खेळत होती" 'श्रावणमास' या कवितेत ते म्हणतात - "श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे क्षणात येते सरसर शिरवे क्षणांत फिरुनी ऊन पडे" 'पाऊस' या कवितेतील पुढील ओळी 
- "थबथबली ओथंबून खाली आली जलदारी मज दिसली सायंकाळी" 
'अरुण' या कवितेतील - 

"पूर्वसमुद्री छटा पसरली रम्य सुवर्णाची कुणी उधळली मूठ नभी ही लाल गुलालाची"

 या ओळी पहा किती विविध दृश्य आहेत ही 
 "ते डोंगर सुंदर दूरदूरचे बाई, पाहीन गडे त्या हिरव्या हिरव्या राई त्या विमल जलासह वळणे वळणे घेत हिंडून झऱ्याच्या शीतल कुंजवनात"

 "फिकट निळीने रंगविलेला कापूस मेघांचा वरुनी कुणी गुलजारी फिरविला हात कुसुंब्याचा" 

अशा शेकडो निसर्गदृश्ये बालकवींच्या कवितांत विखुरली आहेत फुलराणी ,अरुण,संध्यारजनी,श्रावणास मेघांचा कापूस इ.सर्वच कवितेतील निसर्ग बालकवींनी आपल्या बालपणीच्या मुग्ध शैशवी डोळ्यांनी पाहिलेला वा पंचेंद्रियांनी अनुभवला होता त्यामुळे बालकवींची निसर्गकविता म्हणजे मानवी भावनांच्या आविष्काराचा सुंदर आरसा झाला आहे शब्द,स्पर्श,रूप,रस,गंध या पंचेंद्रियांच्या पाच अनुभूती व गती ही सहावी जाणीव त्यांच्या सर्व कवितात त्यांच्या कवितेतील "औदुंबर जलात पाय टाकून अवतीभवतीचे दृश्य शांतपणे न्याहाळतो आहे निसर्ग सर्वत्र क्रीडाच करतो आहे. 


त्या कवितेतील नाद,ताल वता चार अप्रातम मिश्रण जगातल्या कुठल्या दुसऱ्या भाषेत असू शकेल काय ? असा विचार मनात येतो व भाषत नसणारा एक नवाच शब्द फुलराणी हा मराठीत रुजला व फुलराणीचा विवाह ही घटनासुद्धा जगाच्या वाङ्मयात अमर झाली. "कुणी नाही ग कुणी नाही आम्हांला पाहत बाई शांती दाटली चोहीकडे या ग आता पुढेपुढे लाजत लाजत हळुच हासत खेळ गडे खेळू काही कोणीही पाहात नाही' या ओळीत कोणाचे वर्णन आहे? 


अंगणात खेळणाऱ्या लहान मुलींचे की आकाशात रात्री चमचमणाऱ्या चांदण्यांचे? बालकवींनी मराठी निसर्गकवितेला ही देणगी दिलेली आहे त्यांनी आपल्या तरल मनाच्या भावावस्था निसर्गातील विविध रूपांतून अनुभवत्या सौंदर्यग्रहणाची अतिशय कोमल व तरल शक्ती बालकवींच्या मनात होती तसा त्यांचा ध्यास होता. 

"
सुंदरतेच्या सुमनावरचे दव चुंबनि घ्यावे चैतन्याच्या गोड कोवळ्या उन्हात हिंडावे प्रीतिसारिका गीत तियेचे ऐकावे कानी बनवावे मग धुंद रंगुनी काव्यसुधा पानी" 

आणि हा ध्यास असणाऱ्या कवीच्या मनाला दुसरी पण बाजू होती त्यांच्या मनाचा पारवा कधीकधी कोलावर बसून खिन्न निरस एकांत गीत गातो एखाद्यावेळी तो म्हणतोच "कोठुनी येते मला कळेना उदासीनता ही हृदयाला काय बोचते ते समजेना हृदयाच्या अंतहृदयाला" "आनंदी आनंद गडे म्हणता म्हणता बालकवींच्या शून्य मनाच्या घुमटात कसले तरी घुमते गीत" अशाप्रकारे आनंदाच्या व दुःखाच्या अनेक परी वर्णन करून गाणारा बालविहग बालकवी अपघातात मृत्यू पावतो नि मराठी माणसाच्या मनात निसर्ग प्रेमाचे अमररूप घेतो.
मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद  . पुढील निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद


निबंध 4

maza avadta kavi marathi nibandh | माझा आवडता कवी मराठी निबंध



तुलसीदास गोस्वामी तुलसीदास माझे आवडते कवी आहेत. त्यांच्या सर्व साहित्यकृती मला आवडतात. परंतु मला सर्वात जास्त त्यांचे 'रामचरित मानस' आवडते. त्यातील कित्येक दोहे आणि चौपदया मला तोंडपाठ आहेत. ते गाताना, गुणगुणताना मला आनंद होतो. ते मला मार्गदर्शन करतात. 


दु:ख संकटात निकटच्या मित्राप्रमाणे मला साथ देतात. त्यातील शिकवण आणि उपदेश यांच्याबरोबर जो संगीताचा वापर केलेला आहे तो वर्णन करणे शब्दापली- कडचे आहे. 'रामचरित मानस' रामकथा आणि रामचरित्रावर आधारित अतुलनीय एक महाकाव्य आहे. 


मागील कित्येक शतकांपासून याचा भारतीयांवर गाढ प्रभाव आहे. सुशिक्षित, अशिक्षित, स्त्री-पुरुष सर्व जातीधर्मांचे व वर्गाचे लोक यापासून प्रेरणा, सामाजिक मर्यादा व नैतिकतेचे धडे घेतात. त्यातील आदर्शाप्रमाणे चालण्याचा प्रयत्न करतात. 


भारतातील धर्मप्रवण जनतेत हे महाकाव्य एका अद्वितीय दीपस्तंभाप्रमाणे प्रेरणास्त्रोत्राच्या रूपात ओळखले जाते. त्याची लोकप्रियता आणि व्यापक प्रभावाची अनेक कारणे आहेत. हा ग्रंथ आज ही तितकाच महत्त्वपूर्ण व प्रासंगिक आहे जितका तो त्याच्या रचनेच्या वेळी होता.

तुलसीदास एक महान लोकनायक होते. त्यांनी लोकहितासाठी आणि जनकल्याणसाठी 'रामचरित मानस' ची रचना केली होती. त्यांच्या अन्य साहित्यकृतीतही लोकसंग्रहाचा भाग मुख्य आहे. खंडन-मंडनाच्या प्रवृत्तीपासून दूर राहून या महान कवीने लोकधर्म, सहजभक्ती समन्वय आणि आदर्शाचा एक अद्वितीय संगम प्रस्तुत केला आहे. 


या घोर कळीकाळात मनुष्य रामाची समर्पण भावाने भक्ती करून या भवसागराला सहज पार करू शकतो.
सगुण भक्ती, ज्ञान आणि समन्वययाच्या दृष्टीने 'रामचरितमानस' अतुलनीय आहे. त्याची तुलना दुसऱ्या कोणत्याच अशा प्रकारच्या ग्रंथाशी करता येत नाही. 


जीवनात ज्या आदर्शाची कल्पना तुम्ही करू शकता ती यात आहे. राम आदर्श पुत्र, पती, राजा, मित्र, धनी आहे. भरतामध्ये भावाच्या आदर्शाची पराकाष्ठा आहे. तर हनुमान सेवा, त्याग, तपश्चर्या आणि वीरतेची महान् मूर्ती आहे. सीता पत्नीचे अत्यंत सुंदर आणि श्रेष्ठ उदाहरण. आहे. 


भारतातील प्रत्येक स्त्रीची इच्छा सीतेप्रमाणे त्यागी, तपस्विनी, पतिव्रता, दृढव्रता, व्यवहार-कुशल, विनम्र आणि एकनिष्ठ होण्याची असते. लक्ष्मणाचा त्याग आणि तपश्चर्या अद्वितीय आहे. बंधू राम आणि मातृस्वरूप सीतेच्या सेवेसाठी त्याने सर्व राजविलासाचा त्याग केला, इतकेच नव्हे तर आपली नवविवाहित पत्नी ऊर्मिलेलाही त्याने अयोध्येलाच सोडले. 


सुग्रीव आणि केवट ही मित्रत्वाची अजोड उदाहरणे आहेत. तर दशरथ हे पुत्रप्रेमाचे. रामाचे राज्य एक आदर्श राज्य होते. गांधीजी भारतात याच रामराज्याच्या स्थापनेचे स्वप्न पाहत होते. कविश्रेष्ठ तुलसीदास म्हणतात जासुराज प्रिय प्रजा दुखारी सो नर प्रवसि नरक अधिकारी। 


आधुनिक राजकीय पुढारी, राजकारणी मुत्सद्यांनी यातून प्रेरणा, प्रोत्साहन आणि मार्गदर्शन घेऊन त्यानुसार चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे. रामाने निर्वासित असूनही रावण, कुंभकर्ण, मेघनादासारख्या अतिबलवान, पराक्रमी आणि मायावी राक्षसांचा संहार करून जनतेला व ऋषिमुनींना भयमुक्त केले. राम हे, असीम. 



आत्मशक्ती, चारित्र्य आणि तपश्चर्येमुळेच प्राप्त झालेल्या सिद्धीचे साकार रूप होते. त्याच क्षमतांमुळे ते अंजिक्य ठरले आणि अनेक राक्षसांचा, दैत्यांचा, असुरांचा त्यांनी संहार केला. तरीही ते अत्यंत उदार विनम्र, सहिष्णु आणि मोठ्या मनाचे होते. 


स्वार्थ आणि अभिमान यांचा तर त्यांना स्पर्शही झाला नव्हता. वानर, निषाद, भिल्ल इत्यादी आदिवासी जमातींकडून मदत घेण्यात व त्यांच्याशी मैत्री करण्यात त्यांना यकिंचितही संकोच वाटला नाही. उलट रामाला त्यांचा अभिमान वाटला. जटायुसारख्या पक्ष्यालाही त्यांनी हृदयाशी धरले व आदरपूर्वक आपला मित्र बनविले. 


शबरीची बोरे खाऊन स्वत:ला धन्य मानले. शिळा झालेल्या अहिल्येचा त्यांनी उद्धार केला. सर्वाचेच हित त्यांनी केले. 'रामचरितमानस' समन्वयाचा एक विराट प्रयत्न आहे. यात सगुण-निर्गुण, शैव-विष्णु, भक्ती, ज्ञान, भक्ती-कर्म, गाहेस्थ-वैराग्य शासक आणि शासित इत्यादीचा समन्वय दिसून येतो. 


अवधी आणि ब्रज या भाषांमध्ये त्यांनी आपले लेखन केले. तुलसीदासाची कितीही स्तुती केली तरी ती कमीच आहे. माझ्याप्रमाणे अनेकांचा हा साहित्य भक्ती ग्रंथ आहे. संस्कृतीदर्शन, संगीत इत्यादी दृष्टिकोनातून रामचरितमानस एक अद्वितीय ग्रंथ आहे. ज्याचा सर्व भारतीयांना अभिमान वाटणे स्वाभाविकच आहे. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद


maza avadta kavi marathi nibandh | माझा आवडता कवी मराठी निबंध