झाडे नसती तर मराठी निबंध बघणार | if trees were not there essay in marathi
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण झाडे नसती तर मराठी निबंध बघणार आहोत. या निबंधामध्ये झाडे नसल्यावर कोणत्या गोष्टी अशक्य होतील याविषयी सविस्तर माहीती दिली आहे चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.
![]() |
if-trees-were-not-there-essay-in-marathi |
स्वत: उन्हात उभे राहून जे दुसऱ्यांना सावली देतात आणि दुसऱ्यांसाठी फळेसुद्धा धारण करतात ते वृक्ष जणू सत्पुरुषच आहेत, असे वृक्षांचे यथार्थ वर्णन सुभाषितकारांनी केलेले आहे. सर्वांना सुखावह सावली देणारी ही झाडे नसती तर... विविध रंगांची व आकारांची पाने नसती. सुगंधी फुले नसती. मग रसाळ फळे कुठली? मग शंकराला बेल, गणपतीला दूर्वा, सत्यनारायणाला तुळस आणि मंगळागौरीला सोळा प्रकारची पत्री कोठून मिळाली असती?
झाडे नसती तर हापूसचा आंबा खायला कसा मिळाला असता? कच्ची कैरी, लालबुंद सफरचंद, डाळिंब, पेरू, अननस अशा फळांची चंगळ नसती. चाफा, मोगरा, गुलाब यांचा मन प्रसन्न करणारा सुवास आणि वेड लावणारे सौंदर्यच नसते. पिंपळाच्या पारावरच्या गप्पा, वडाच्या सूरपारंब्यांचा खेळ, पारिजातकाचा सडा या साऱ्या गोष्टींतील मौजच हरवली असती!
आज अनेक औषधे वनस्पतींपासून उपलब्ध होतात. कडुनिंबाची पाने आरोग्याची हमी देतात. तुळशी, बेहडा, सबजा इत्यादी औषधी वनस्पती मानवाला वरदाणापेक्षा कमी नाहीत आहेत. झाडे नसती तर आयुर्वेद निर्माण झाला नसता. झाडे नसती तर... वाऱ्याचे अस्तित्व कसे जाणवले असते? पाऊस आला नसता... मातीची धूप थांबली नसती. चंदनाचे झाड नसते तर विरहार्ताला शीतलता आणि देवपूजेला गंध नसते. झाडे नसती तर प्रदूषणाची गंभीर समस्या निर्माण झाली असती. प्राणवायूचा पुरवठा कसा झाला असता?
झाडे नसती तर कवीमंडळींची फार अडचण झाली असती. 'त्या तरुतळी विसरले गीत' अशी सुंदर काव्यपंक्ती निर्माणच झाली नसती. श्रावणात झोपाळे कोठे बांधले असते? सुगरण पक्ष्याने आपला घरोटा कोठे बांधला असता?
झाडे नसती तर... गजराजासारख्या शाकाहारी प्राण्यांनी काय केले असते? प्रत्येक शुभप्रसंगी आंब्याची पाने घरात मांगल्य आणतात. भाजी-आमटीच्या फोडणीची लज्जत कढीपत्ता वाढवतो. झाडे नसती तर... माणसाच्या जीवनातील हिरवेपणा, मृदुताच हरवली असती. मग चांदोबा कोठे लपला असता? हिरव्या चाफ्याला सुगंध लपवण्याची गरजच पडली नसती. रजनीगंधा धुंद झाली नसती. वृक्षाविना सारे जीवन रूक्ष झाले असते. मानवाच्या जीवनातील प्रत्येक क्षण झाडांशी इतका निगडित आहे की, त्यामुळेच माणूस आपल्या वंशावळीला 'वंशवृक्ष' असे सार्थ अभिधान देतो. असा हा मानवाचा थोर मित्र नसेल तर मानवी जीवन नष्टप्राय होईल.
मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता . धन्यवाद
महत्वाचे मुद्दे :
(टीप : निबंध लिहीताना आपण खालील महत्वाचे मुद्दे वापरू शकता. )
- झाडांचे महत्त्व व उपयुक्तता
- झाडांचे विविध प्रकार
- प्रदूषण
- फळे, फुले, लाकडे, औषधे
- निसर्गसौंदर्यात काव्य असते
- पाण्याचा पुरवठा
- वनसंपत्ती उत्पादन
- पशु-पक्षी आणि मानवी जीवनाचा आधार
vij nasti tar marathi nibandh | वीज नसती तर मराठी निबंध
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण वीज नसती तर मराठी निबंध बघणार आहोत. कोणत्याही वस्तुचे हे फायदे तोटे असतातच हेच तत्व विजेबाबत लागु पडते दैनदिन जिवनात आवश्यक असणारी विज नसती तर त्याचे काय परीणाम झाले असते हें या निबंधात दिले आहे चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.
![]() |
vij-nasti-tar-marathi-nibandh |
परवाच एका झोपडपट्टीला मोठी आग लागली. सुमारे अडीच हजार झोपड्या जळून खाक झाल्या. गोरगरिबांच्या उभ्या संसाराची राख झाली. सुमारे दीडशे माणसे होरपळून मेली. त्यांत तीन-चार महिन्यांच्या बाळापासून ते सत्तर वर्षांच्या वृद्धापर्यंतची माणसे होती. होरपळेलेली, आपल्या वस्तू, आपले जिवलग यांचा जिवाच्या आकांताने शोध घेत सैरावैरा झालेली हजारो माणसे T.V. पडद्यावर पाहताना काळीज पिळवटून निघत होते. T.V. वर बघणेही नकोसा वाटणारा हा हृदयद्रावक प्रसंग निर्माण केला होता विजेने !
होय, विजेनेच ! शॉर्टसर्किट होऊन आगीने अक्राळविक्राळ रूप धारण केले होते. या विजेनेच क्षणार्धात होत्याचे नव्हते करून टाकले होते ! ही वीज नसती ना, तर हा उत्पात घडलाच नसता ! कधी कधी मनात येते, माणसाने ही वीज निर्माण करून संकटाचा केवढा मोठा डोंगर उभा करून ठेवला आहे ! खरंच, माणसाने ही वीज निर्माण करायलाच नको होती. नसतीच ही वीज, तर किती बरे झाले असते !
खरोखर, ही वीज निर्माणच झाली नसती तर ? तर... रात्री झगमगीत वाटल्या नसत्या ! माणसाला निरांजनाची-समईची ज्योत, मेणबत्तीचा, कंदिलाचा उजेड यांचाच आश्रय घ्यावा लागला असता. आनंदाच्या प्रसंगी केली जाणारी रंगीबेरंगी नेत्रदीपक रोषणाई केवळ स्वप्नात वा कल्पनेतच राहिली असती.
जीवनातील प्रत्येक क्षेत्रात विजेचे विलक्षण सामर्थ्य मानवासाठी उपयुक्त ठरले आहे. आज घरातील सर्व प्रकारच्या कामांत वीज ही गृहिणीची सखी झाली आहे. दळणे, कापणे, भाजणे, शिजवणे, केर काढणे, कपडे धुणे, स्वच्छता करणे अशा अनेक कामांत तिला विजेची मोलाची मदत मिळते.
आजच्या या यंत्रयुगात बरीचशी यंत्रे फिरतात, ती विजेच्या सामर्थ्यावर. वीज नसती तर इतकी यंत्रे फिरली नसती. औदयोगिक क्षेत्रात आज झालेली मानवाची प्रगती विजेविना शक्य झाली असती का? अगदी वैदयकीय क्षेत्रातही ही वीज मोठी कामगिरी करते. अशक्त बाळाला 'इनक्युबेटर'मध्ये ठेवले जाते, त्यासाठी वीज हवीच असते. शल्यविशारद शस्त्रक्रिया करतात, तेव्हा वीज आवश्यक असते.
आज विजेवर चालणाऱ्या T.V. मुळे तसेच इंटरनेटमुळे आपण घरात बसून जगाचा फेरफटका मारू शकतो. संगणकामुळे जग जवळ आले आहे. ज्ञानविज्ञानाची भांडारे खुली झाली आहेत. वीज नसती तर हे कसे शक्य झाले असते? अंतरिक्षातील ही शक्ती माणसाने आपल्या मुठीत बंद करून घेतली आहे. ती जर त्याने गमावली, तर तो दुबळा व असहाय होईल.
मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता . धन्यवाद